कामगारांच्या अपघात प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

| महाड | प्रतिनिधी |

महाड औद्योगिक क्षेत्रातील हायकल लिमिटेड या कारखान्यांमध्ये रिअ‍ॅक्टरमधील रासायनिक उत्पादनाने पेट घेतल्याने तीन कामगार भाजून जखमी झाले होते. या घटनेला जबाबदार असल्याप्रकरणी कंपनीमधील चार अधिकार्‍यांसह एका ठेकेदाराविरोधात महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.26 संध्याकाळच्या सुमारास घडली होती.

महाड औद्योगिक वसाहतीमधील हायकल लिमिटेड या कारखान्यात एचएससी 255 या रसायनाचे उत्पादन काढण्याचे काम सुरू असताना रिअ‍ॅक्टरचे झाकण उघडले गेल्याने त्यातील रसायनाने पेट घेतला व ती आग बाहेर आल्याने या जवळ काम करणारे ओमकार दिवेकर (23), तुकाराम धनावडे (35) व अनिलकुमार भारती (22) हे तीन कामगार भाजून जखमी झाले. त्यांना कंपनीकडून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्वरित उपचार झाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे.

याप्रकरणी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे कामगार जखमी झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कंपनीमधील राजेश सालेकर, अनंत सोनावणे, सुधीर मगर व मनोज महाडिक यांच्यासह ठेकेदार अनंत देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version