राज ठाकरेवर औरंगाबादेत गुन्हा दाखल

। औरंगाबाद । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1 मे रोजी घेतलेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे व्यक्तव्य करू नये. धर्म, भाषा, जात, वंश यावरून चिथावणी देणारी भाषणे टाळावी यासह पोलीस आयुक्तांनी 16 अटी शर्तीनुसार राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती, मात्र ठाकरेंनी दोन समाजात बाधा निर्माण होईल असे वक्तव्य केले. चिथावणी देणारे भाषण केले यासह अनेक अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनिरीक्षक गजानन इंगळे यांच्या फिर्यादीवरून राज ठाकरे यांच्यासह राजीव जेवलीकर आणि।इतर संयोजक यांच्याविरोधात कलम 116,117,153 भादवि 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी करत आहेत.

भाषण पोलिसांनी ऐकले 5 तास
राज यांची सभा झाल्यानंतर या सभेचा अहवाल गृह मंत्रालयाने मागविला होता. सभेसाठी परवानगी देताना घालून दिलेल्या 16 अटी शर्तींचे उल्लंघन झाले की नाही हे तपासण्यासाठी पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अपर्णा गीते यांनी सायबर शाखेत पाच तास बसून राज ठाकरे यांचे 45 मिनिटांचे भाषण ऐकले. त्यानंतर अहवाल बनविण्याचे काम सुरु झाले होते.

Exit mobile version