रुग्णवाहिकेच्या धडकेत झाला होता मृत्यू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पोयनाडकडून अलिबागकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या धडकेने महिला गंभीर जखमी झाली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. ही घटना पेझारी चेकपोस्ट पुढे पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर बुधवारी (दि.25) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात चालकाविरोधात मंगळवारी (दि. 31) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेझारी येथील चालक एम.एच 14 सी.एल. या क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन पोयनाड करून अलिबागकडे जात होते. बुधवारी (दि. 25) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पेझारी चेकपोस्ट पुढील पेट्रोल पंपासमोर आल्यावर एका पादचारी महिलेला जोरदार धडक लागली. या धडकेत तिच्या चेहऱ्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात रुग्णवाहिका चालकासह मयत महिलेला आरोपी करण्यात आले आहे. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष केले. चालताना कोणतीही खबरदारी घेतली नसल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.






