| पनवेल | प्रतिनिधी ।
साखरपुड्याचा सोहळा पार पडताच अभियंता असलेल्या वराने लग्नापूर्वी 50 लाख रुपये रोख हुंड्याची मागणी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी पाच जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीतील पिडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथे राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह मुंबईतील दादर (पश्चिम) येथील 30 वर्षीय इंजिनीयर (अभियंता) तरुणासोबत ठरला होता. अनुरूप विवाह संस्थेच्या संकेतस्थळावरील ओळखीतून हा विवाह निश्चित करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 20 जून रोजी पनवेलजवळील शेडुंग फाटा परिसरातील शिल्प रिसॉर्ट येथे साखरपुडा आणि हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडताच वराने वधूच्या मावशीकडे लग्नापूर्वी 50 लाख रुपये रोख देण्याची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वधूपक्षाने वर आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मागणीवर ठाम राहत वधूपक्षाला शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वधूपक्षाने कार्यक्रमस्थळ सोडून डोंबिवली गाठली. त्यानंतर डोंबिवली पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक नोंदीनंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अभियंता वरासह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.






