चिटफंडप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील चार आरोपींनी नागरिकांचा विश्‍वास संपादन करुन त्यांच्याकडे पैसे गुंतवण्यास सांगितले. नागरिकांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवत लाखो रुपये गुंतवले. परंतु, ते पैसे काही काळानंतर देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी माणगाव पोलिसात तक्रार दाखल केली.

याबाबत हकीकत अशी की, माणगाव पोलीस ठाणे येथे आरोपी संदेश सुरेश कवडे, रा. वंदना अपार्टमेंट, कचेरी रोड, माणगाव, मनोज सदानंद तेटगुरे, रा. साळवे, ता. माणगाव, देवेंद्र पांडुरंग गायकवाड, रा. निजामपूर व संजय बाळकृष्ण गायकवाड, रा. कचेरी रोड, अपना मेडिकल वरती, तिसरा मजला, माणगाव यांनी अ‍ॅडव्हायझरी व ट्रस्ट इंटरप्रायझेस नावांनी कंपनी स्थापन करुन बिझनेस ऑफिस सुरु केले असल्याचे लोकांना सांगून, त्या बिझनेसमध्ये लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. लोकांनी केलेल्या गुंतवणुकीची रक्कम व्यवसायात टाकून त्या व्यवसायातील मिळणार्‍या नफ्यातून गुंतवणूकदारांना नफ्याची 6 ते 7 टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला देऊ असे सांगितले व लोकांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ करुन आरोपींनी अनेक गुंतवणूक दारांची फसवणूक केलेली असल्याचे निषन्न झाले आहे.

तरी सदरच्या आरोपींकडून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या लोकांनी माणगाव पोलीस ठाणे येथे येऊन त्याबाबत तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version