| मुंबई | प्रतिनिधी |
विधान भवनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हाणामारीनंतर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा नितीन देशमुख व ऋषीकेश टकले यांना ताब्यात घेण्यात आले.
विधिमंडळ अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ आव्हाड यांनी अन्य कार्यकर्त्यांसमवेत पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या हाणामारीवरून राजकीय वातावरण तापले असताना आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यावरूनही नाट्य रंगले. माझा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना विधान भवनात मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे पळून गेले आणि मार खाणाऱ्या कार्यकर्त्यालाच पोलिसांनी पकडले. सत्ताधाऱ्यांना इतके शरण गेलेले प्रशासन मी पाहिले नाही, असा आरोप आव्हाड यांनी समाज माध्यमांवर केला आहे. त्याप्रकरणी आता आव्हाड यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करून वाहनासमोर बसलेले आव्हाड आणि कार्यकर्त्यांना बाजूला केले.






