दिवेआगरच्या सरपंचांवर गुन्हा दाखल

मालमत्ता लपवल्याची तक्रार

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

निवडणूक उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याच्या आरोपावरून दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय सुदाम तोडणकर यांच्याविरोधात श्रीवर्धन पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एप्रिल 2026 मध्ये झालेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत तोडणकर जनतेतून थेट सरपंचपदी निवडून आले होते. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या व कुटुंबाच्या मालकीची स्थावर मालमत्ता लपवल्याची तक्रार ग्रामस्थ सिद्धेश कोसबे आणि महेश पिळणकर यांनी तहसील कार्यालयात केली होती. माणगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता क्रमांक 225 (फ्लॅट क्रमांक 8-201, श्री मानजी कॉम्प्लेक्स, उतेखोल) तोडणकर यांच्या नावावर असूनही प्रतिज्ञापत्रात तिचा उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात आला होता.

नगरपंचायत आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालातून मालमत्ता तोडणकर यांच्या नावावर असल्याची खात्री झाल्यानंतर महसूल नायब तहसीलदार मनोज माने यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी (दि. 18) तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र नोंद केली. या प्रकरणात तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याची सूचना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version