| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
जबरदस्तीने पैशांची मागणी करून पैसे दिले नाहीत तर ट्रॅव्हल्स पुढे सोडणार नाही असे बोलून 3 हजार रुपये मोबाईल क्रमांकावर स्वीकारल्याप्रकरणी दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात दोन ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी माझी अब्दुल वाहिद शेलिया (राहणार वसई पश्चिम) यांची ट्रॅव्हल्स पॅसेंजर उतरण्याकरता मुंबई पुणे हायवेवर कळंबोली मॅकडोनाल्डच्या समोर थांबली असताना आरोपी महेश देवकर आणि ऋषी घोरपडे हे त्यांच्या ट्रॅव्हल जवळ आले आणि त्यांनी ट्रॅव्हल्समधील दोन्ही चालक शिपाई आणि कडीवाल यांना बाहेर बोलावले आणि त्यांना मारहाण केली. यावेळी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असलेल्या पॅसेंजरला ट्रॅव्हल्स मधून बाहेर घेऊन मारहाण केली. आणि त्यांच्याकडे तीन हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम दिली नाही तर ट्रॅव्हल्स पुढे सोडणार नाही असे सांगितले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या मालकाला फोन केला आणि महेश देवकर यांच्या मोबाईलवर 3 हजार रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर आरोपींनी ट्रॅव्हल्स घेऊन जाण्यास सांगितले. हा प्रकार 20 सप्टेंबर रोजी घडला. यावेळी ट्रॅव्हल्स मध्ये पॅसेंजर असल्याने आणि चालक पुणे येथे गेल्याने पोलीस ठाण्यात 2 ऑक्टोबर रोजी आले. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.







