राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह तहसीलदार, तलाठ्यांचा समावेश
। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील पढवण येथील 2011 ते 2014 या दरम्यान झालेल्या अपात्र व्यक्तींना जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नाना भौड, तत्कालीन तहसीलदार कविता जाधव, तलाठी सदानंद कुडाळकर, तलाठी एस.एस.सातांबेकर, रामचंद्र पांडुरंग काजारे, हरी नारायण हुमने, विश्राम गणू घाणेकर, नारायण जाणू तांबिटकर व धर्मा पवार या नऊ जणांवर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा तालुक्यातील पढवण येथे 2011 ते 2014 या काळात पात्र असलेले कुळधारक यांच्याऐवजी ज्यांच्या नावे मिळकती नाहीत, त्या व्यक्तींच्या नावे मिळकती ओढण्यात आल्या. तसेच पात्र क्षेत्रापेक्षा वाढीव क्षेत्राचे वाटप करून जमिनींची विक्री करण्यात आली. यासाठी तत्कालीन तहसीलदार कविता जाधव, तलाठी सदानंद कुडाळकर, एस.एस.सातांबेकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भौड यांच्यावर गैर कायदेशीर आदेश व अहवालाच्या आधारे अपात्र व्यक्तींना जमीनी वाटप केल्याच्या आरोपाखाली व शेतकरी सुरेश मालू जाधव, गोविंद गणपत विचारे, भागोजी पांडुरंग नाडकर यांची अंदाजे रक्कम 67,18,400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई हे करीत आहेत.
