फळे-भाज्यांमध्ये भेसळ आढळल्यास गुन्हे दाखल

बाजार समित्यांना इशारा

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या फळे, भाज्या, मसाले आणि सुका मेवा यामध्ये भेसळ किंवा घातक रसायनांचा वापर आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याबरोबरच संबंधित व्यापाऱ्यांचे परवानेही रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश पणन संचालक शरद जरे यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना दिले आहेत.

एपीएमसीमध्ये आंब्यावर केमिकल स्प्रे फवारणी झाल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत पणन विभागाने बाजार समित्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सभापती यांनी शेतमालाची नियमित व काटेकोर तपासणी करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

फळे कृत्रिमरित्या पिकविणे, त्यांची गोडी व रंग वाढविण्यासाठी रसायनांचा वापर करणे, भाजीपाला आणि अन्नधान्य आकर्षक दिसावे किंवा अधिक काळ टिकावे यासाठी घातक रसायनांचा वापर करणे यावर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच वजन-मापांबाबत तक्रारी आल्यास तातडीने कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. भाजीपाला, फळे आणि फुलांच्या वाहतूक व साठवणुकीसाठी कमी जाडीच्या प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून संबंधित शेतमालाची तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई प्रस्तावित करावी, असे आदेशही पणन विभागाने दिले आहेत.

Exit mobile version