एकाच वेळी 92 लाख लाभार्थ्यांना वगळलं; विविध निकषांमुळे लाभार्थी संख्या 1.67 कोटींवर
| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महायुती सरकारची सर्वाधिक चर्चेतील योजना ठरली होती. या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देत जनतेचा कौल मिळवल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात असतानाच, आता ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा, वाहन मालकीसह विविध निकषांमुळे पात्र लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने राज्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या योजनेतील 3,542 कोटी रुपयांच्या खर्चासंदर्भात कॅगनं ताशेरे मारले आहेत. याशिवाय 92 लाख लाभार्थी वगळल्याची चर्चा आहे. दरम्यान, निवडणुकीत आश्वासनांची खैरात आणि सत्तेत आल्यानंतर अटी-शर्तींचा पाऊस पाडत सरकारला लाडकी बहीण नकोशी झाली असून, विविध अटी-शर्तींच्या जंजाळात अडकून लाडकी बहिणीला ‘अपात्र’ करण्याचा डाव आखण्यात येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 2 कोटी 43 ते 2 कोटी 47 लाख महिला पात्र मानल्या गेल्या होत्या. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया आणि इतर निकष लागू झाल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या घटून 1 कोटी 67 लाखांवर आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
योजनेतील लाभार्थी संख्या कमी झाल्याने सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी महिलांना आर्थिक मदतीची हमी देऊन मते मिळवली आणि सत्तेत आल्यानंतर विविध अटी घालून लाखो महिलांना योजनेबाहेर केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांमध्येही याबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या घटल्याने राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले असून, पात्र महिलांना न्याय मिळावा आणि अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
लाडकी बहीण योजनेची आकडेवारी
एकूण नोंदणी
2 कोटी 63 लाख
सुरुवातीला पात्र लाभार्थी
2 कोटी 43 ते 2 कोटी 47 लाख
ई-केवायसीनंतर पात्र लाभार्थी
1 कोटी 67 लाख
शेवटच्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या महिला (डीबीटी)
1 कोटी 67 लाख
ई-केवायसी न केलेल्या महिला
60 लाख
आयकर निकषामुळे अपात्र
सुमारे 5 लाख उत्पन्न मर्यादा (अडीच लाखांपेक्षा अधिक)
14 ते 15 लाख
वाहन मालकीमुळे अपात्र
4.5 ते 5 लाख
रायगडची आकडेवारीच उपलब्ध नाही
राज्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र व अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर होत असताना, रायगड जिल्ह्यातील लाभार्थ्यांची माहिती मात्र उशिरपर्यंत मिळू शकली नाही. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाकडे माहिती विचारणा केली असता, संबंधित विभागाचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी “आज माहिती उपलब्ध नाही, उद्या देतो,“ असे उत्तर दिले. त्यामुळे रायगडमधील पात्र, अपात्र आणि लाभार्थी महिलांची नेमकी संख्या समजू शकली नाही.
आदिती तटकरे,
ऑगस्ट 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि त्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही एप्रिलपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली. त्यांच्या माहितीनुसार, सुमारे 60 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. तसेच आयकर विभागाच्या माहितीनुसार, सुमारे 5 लाख, तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे 14 ते 15 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. वाहन मालकीच्या निकषामुळेही सुमारे 4.5 ते 5 लाख महिलांची नावे अपात्र ठरल्या आहेत.
महिला व बालविकास मंत्री







