आर्यन प्रकरणातील एनसीबीच्या प्रत्येक अधिकाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी

शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातून रोखठोक मत

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आर्यन खान प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता शिवसेनेनं अमलीपदार्थविरोधी पथक आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. आर्यन खान याच्यासंदर्भात न्यायालयाने दिलेले आदेश अद्याप मी सविस्तर वाचलेले नाहीत. मात्र न्यायालयाने आर्यन खानला क्लीनचिट दिली असेल तर केंद्रीय तपास संस्थेने हे प्रकरण कशासाठी घडवले गेले, याची चौकशी करावी लागेल, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे यांनी व्यक्त केलेलं असतानाच सत्ताधारी शिवसेनेनंही या प्रकरणामुळे एनसीबीचं थोबाड फुटलं आहे, असं म्हटलंय.
केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात जो खेळ चालवला आहे, त्याची पोलखोल रोजच होत आहे. स्टारपुत्र आर्यन खानच्या विरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या मोबाईलवरील संभाषणातही कटकारस्थानासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले. याचा अर्थ एनसीबीच्या टोळीने हा सर्व बनाव रचला आणि आर्यन खानसह इतर मुलांना वीस-पंचवीस दिवस नाहक तुरुंगात डांबले. आर्यनविरोधात एनसीबीच्या आरोपात तथ्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण असेल तर या पोरांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा, असं रोकठोक मत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखामधून व्यक्त केलंय.

Exit mobile version