। हिंगोली । प्रतिनिधी ।
राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सोमवारी (दि.2) राज्यातील जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सोमवारी (दि.1) एकीकडे मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुसरीकडे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून पैसे वाटप, आमिष दाखवून होणाऱ्या इतर वस्तूंच्या वाटपाकडे लक्ष ठेऊन होती. त्यातच, हिंगोली शहरात टाटा नेक्सन कंपनीच्या चार चाकी गाडीमधून एका पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये 100, 200, 500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल अशी 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली ही रोकड एका खासगी व्यापाऱ्याची असल्याची माहिती मिळत असून कॅश बाळगण्याबाबत आमच्याकडे परवानगी असल्याचे संबंधित व्यक्तीने म्हटले आहे. या संपूर्ण रोकडची तपासणी व प्राथमिक चौकशी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. मात्र, निवडणूक काळात मतदानाच्या आदल्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.







