समता पंधरवडा अंतर्गत प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र तातडीने देण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक ते 15 एप्रिल या कालावधीत समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. पंधरा दिवसांच्या कालावधीत 501 हून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकाराने जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात जातप्रमाणपत्र पडताळणी समिती आहे. अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागास प्रवर्गातील अकरावी, बारावी विज्ञान शाखा, अभियांत्रिकी पदविका तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या माध्यमातून जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यामध्ये एक ते 15 एप्रिल या कालावधीत समता पंधरवडा विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. या कालावधीत प्रलंबित व त्रुटी असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या माध्यमातून करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा उपक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कागदपत्रांची पूर्तता करणार्या 501 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य जयंत चाचरकर यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. समता पंधरवडा अंतर्गत राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज या कालावधीत केले आहेत. त्यांना लवकरच जातवैधता प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समता पंधरवडा अंतर्गत राबविलेल्या या विशेष मोहिमेतून शेकडो विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.