महिलेचा गळा दाबून घातपात केल्याचा अंदाज
। कर्जत । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावरील कर्जतपासून खंडाळा भागातील स्टेशन ठाकूर वाडी येथे रेल्वे मार्गाच्या बाजूला सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या खुनाचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. हा मृतदेह रेल्वे मार्गाच्या कडेला कोणी आणून टाकला की धावत्या रेल्वे गाडीमधून फेकून दिला आहे याचा तपास गुन्हे प्रकटीकरण टीमकडून सुरू आहे.
कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील किलोमीटर क्रमांक ११२ च्या आसपासच्या पटरीलगत एका गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोरीने बांधून सुटकेसमध्ये भरलेल्या या मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असण्याची शक्यता दर्शवली जात आहे. हा मृतदेह अनोळखी असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पथक आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात महिलेच्या शरीरावर कोणतेही जखमेचे चिन्ह नसल्यामुळे तिचा मृत्यू गळा दाबून घातपाताने झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मृतदेह सापडलेली बॅग रेल्वे पटरीपासून अगदी जवळ होती. त्यामुळे हा प्रकार ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस व रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी अनेक पुरावे गोळा केले असून, तपास अधिकाधिक खोलात सुरू आहे.
ही घटना अतिशय संशयास्पद असून या प्रकरणामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस यांच्याकडून तीन तपास पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील तपासासाठी रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे काम करत आहेत. मृत महिलेची ओळख पटवणे आणि या घटनेमागील कारणमीमांसा उलगडणे सध्या तपासाचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम तैनात केली आहे. त्याचवेळी कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे यांचे गुन्हे प्रकटीकरण पथक यांना रवाना करण्यात आले आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक हे कर्जतमध्ये येत असून शालेय मुलींच्या लैंगिक छेड प्रकरण आणि सुटकेसमधील महिलेचा मृतदेह या दोन घटनांचा आढावा जिल्हा पोलीस प्रमुख घेणार असून कर्जत पोलीस ठाणे आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालय यांना गुन्ह्याच्या तपास कामी मार्गदर्शन करणार आहेत.