| रोहा | प्रतिनिधी |
दिवाळीच्या अनुषंगाने रोहे शहरातील दमखाडी नाका ते तीन बत्ती नाक्यापर्यंत फटाके, आकाश कंदील इत्यादी साहित्यांची विक्री करण्यासाठी असंख्य स्टॉल लागत असतात. यंदा मात्र नगरपरिषदेन बहूमताच्या जोरावर येथील सर्व स्टॉल धारकांसाठी नदी संवर्धन गार्डन येथे व्यवस्था केली आहे. त्यामुळे बाजार पेठेतील मोकळ्या जागेवर मोकाट गुरांनी ठिय्या मांडल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी आलिशान व वातानुकूलित कार्यालयात तासांतास बसून शहराच्या विकासासाठी चर्चा करत असतात, त्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर या मोकाट गुरांची कळप दिसून येत आहे.
रोहे शहरात सद्या पिसाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे मोकाट गुरांची समस्या गंभीर होत चालली आहे. विशेष म्हणजे नगरपरिषद चौक परिसरात मोठ्या संख्येने मोकाट गुरे आढळून येत आहेत. ही बाजार पेठेतील मुख्य जागा असून, रहदारी आणि गर्दीचे ठिकाण आहे. कधी कधी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला लागून गुरे बसत असल्याने पहाटे मॉर्निंग वॉक आणि कंपनीत पहिल्या पाळीवर जाणाऱ्या कामगारांना व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे.त्याचप्रमाणे एसटी चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी बाजारात फटाके स्टॉल असल्याने परिसर गजबजलेला दिसून येत असे. आता मात्र स्टॉल नसल्याने मोकळ्या जागेला मोकाट गुरांनी आपला अड्डा बनवला आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यानंतर फेरीवाले अथवा दुकानदारांवर कारवाई करणारे नगर पालिका प्रशासन आता या मोकाट गुरांच्या मालकांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिकाम्या जागेवर गुरांचा ठिय्या
