| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
परतीच्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. अनेकांचे उभे भातपीक शेतातच कुजले तर काहींच्या भाताला कोंब फुटले आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये भात झोडणी झाल्यावर निघणारा पेंढा उरलाच नसल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बळीराजा आणि पशुपालक प्रचंड चिंतेत आहेत.
परतीच्या पावसामुळे रायगडातील काहीजणांच्या हातात उरला सुरलेला भात हाती आला. परंतु, भिजलेला भात काळा पडला आहे. त्यामूळे त्याला बाजारात अत्यल्प किंमत मिळेल. तसेच, भिजलेल्या पेंढ्यामुळे गुरांची वैरण गेली आहे. उभे भातपीक सडल्याने आता पेंढाच उरला नाही. शिवाय पेंढा भिजल्याने तो खाण्यायोग्य व साठवणीसाठी योग्य राहिला नाही. त्यामुळे आता पशुधनाला खायला तरी काय घालायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कारण पावसाळ्यानंतर जनावरांसाठी पेंढा हे महत्वाचे खाद्य आहे. परंतु, आता पेंढाच नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. आता पशुधनाला पेंढ्या ऐवजी सरकी, शेंगदाणा पेंढ किंवा सोयाबीन ढेप हे पर्यायी खाद्य द्यावे लागेल. परंतु, त्याच्या किमती प्रचंड आहेत, तसेच उपलब्ध असलेल्या पेंढ्याचे भाव देखील वाढले आहेत. परिणामी आधीच गांजलेल्या शेतकरी व पशु पालकांना अतिरिक्त खर्चाचा भार पडणार आहे. शिवाय दुध-दूभत्याचे नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांनी खाण्यासाठी ठेवलेला भात खराब झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, हाती पैसा नसल्याने कुटुंबाचा खर्च कसा भागवावा, ही देखील भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे. दूध दुभते पदार्थ विकून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक हातभार लागतो तो देखील पेंढ्या अभावी कमी होणार आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसान भरपाई बरोबरच जनावरांच्या खाद्याची व्यवस्था देखील करावी. तसेच, गरज असेल तिथे चारा छावण्या उभाराव्या.
शरद गोळे,
अध्यक्ष, कृषी मित्र संघटना, सुधागड







