| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील आंबेवाडी बाजारपेठ परिसरात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरच ठाण मांडून बसणारी ही गुरे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आंबेवाडी, कोलाड नाका, भिरा फाटा, तटकरे कॉम्प्लेक्स, हॉटेल प्रभाकर, कोलाड पोलीस चौकी तसेच इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसर अशा गर्दीच्या ठिकाणी ही गुरे रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसून येतात. रात्रीच्या वेळी अंधारात ही गुरे सहज लक्षात येत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
शेतकऱ्यांकडून गुरांना मोकाट सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महामार्गालगतच्या जमिनींना कुंपण करण्यात आल्याने गुरांना मोकळी जागा न मिळता ती थेट महामार्गावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर जंगल परिसरात फिरणारी ही गुरे सायंकाळनंतर रस्त्यावर आश्रय घेतात. परिणामी अनेकदा वाहनांच्या धडकेत गुरे जखमी होतात किंवा दगावतात, तर काही वेळा वाहनचालकांनाही अपघाताचा सामना करावा लागतो. मोकाट गुरांच्या समस्येवर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरअसंख्य ठिकाणी मोकाट गुरांचा कळप रस्त्यावर बसलेली असतात. तर काही ठिकाणी उभे राहतात त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना या गुरांचा प्रचंड त्रास होत आहे. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा.
चंद्रकांत लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ते
