लम्पिच्या भीतीने गुरांचे नमुने तपासनीला

| पनवेल । वार्ताहर ।
राज्यभरात लम्पि आजाराचा प्रदुर्भाव वाढत आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही लम्पि आजाराने त्रस्त पशु आढळून आलेले नाहीत, असे असले तरी प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी पाळली जात असून तालुक्यातील काही गावात गुरांमध्ये लम्पीसदृश आजाराची लक्षणे आढळल्याने या गुरांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तालुक्यातील गुरांमध्ये लम्पि आजाराचा फैलाव होऊ नये या करता पशु वैद्यकीय विभाग विशेष खबरदारी घेत आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी या बाबतचा आढावा घेतला आहे. तालुक्यातील पाले खुर्द आणि वावंजे या दोन गावांतील गुरांमध्ये लम्पीसदृश लक्षणे आढळले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लम्पी हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असल्याने पशुपालकांनी गुरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात जवळपास 13,226 जनावरे आहेत. त्यापैकी 4,572 गोवंशीय व 5,660 म्हैसवर्गीय आहेत. तालुका प्रशासनाने गावागावांत सर्वेक्षण सुरू केले आहे. गोठ्यांमध्ये फवारणी महापालिका क्षेत्रात 175 गोठे असून आठशे जनावरे आहेत. म्हशींची संख्या याठिकाणी जास्त असून लम्पी प्रतिबंधासाठी गोठ्यांमध्ये फवारणी करण्यात आली आहे. तसेच गोशाळेमध्ये सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वावंजे आणि पाले खुर्द या गावांमध्ये लम्पीसदृश स्थिती निर्माण झाल्याने जनावरांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

Exit mobile version