ग्रामस्थांना डोकेदुखी, वाहतूक कोंडीने पादचारी त्रासले
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट गुरांना आवरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नाही, तर ही समस्या अधिक त्रासदायक ठरण्याची चिंता नागरीक व्यक्त करत आहेत. 50 ते 60 च्या झुंडीत रस्त्यावर फिरणारी ही जनावरे वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. पादचार्यांना देखील खूप अडचणी येत असून ही मोकाट जनावरे पालिकरांना डोकेदुखी ठरत आहेत.झुंडीतील जनावरे रस्त्यावर मारामारी करतात. मोकाट गुरे बर्याच वेळेला अपघाताचे कारण बनतात आणि स्वतः देखील अपघातात जखमी होतात. तसेच उकिरड्यावरील प्लास्टिक खाऊन त्यांचे आरोग्य बिघडत आहे. प्लास्टिक खाऊन त्यांचा हकनाक मृत्यू ओढवतो. शिवाय रस्त्यावर व घरांजवळ त्यांचे पसरलेले मलमूत्र यामुळे घाण व दुर्गंधी देखील पसरते. मोकाट गुरांमुळे येथे नियमित वाहतूककोंडी होते. त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, असे पालीतील सुलतान बेनसेकर यांनी सांगितले.
या मोकाट गुरांचा प्रश्न शिवऋण प्रतिष्ठानने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सुधागड महसूल विभाग, पाली नगरपंचायत व पशुसंवर्धन विभाग पाली पूर्ण सहकार्य करीत आहेत. त्यामुळे अशी मोकाट गुरे ज्या शेतकर्यांची असतील त्यांनी ती घेऊन जावीत अन्यथा कायदेशीररित्या ही गुरे तालुक्यातील गरजू शेकर्यांना नियम अटी यांचे पालन करून देण्यात येतील.केतन म्हसके, शिवॠण प्रतिष्ठान उपाध्यक्ष
मोकाट गुरे प्लास्टिक खाऊन दगावतात. त्यामुळे गुरे मालकांनी त्यांची गुरे ताबडतोब घेऊन जावीत. अन्यथा नगरपंचायत मार्फत त्यांना नोटीस पाठवून ही गुरे सामाजिक संस्थेमार्फत गरजूंना व गोशाळेला देण्यात येतील.
दिलीप रायण्णावार, प्रशासक, नगरपंचायत, पाली