। नागोठणे । प्रतिनिधी ।
पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीत दि.18 सप्टेंबर रोजी पाच वाजण्याच्या सुमारास मोकळ्या मैदानातून दोन गुरे इनोव्हा कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून लबाडीने स्वतःच्या फायद्यासाठी गाडीत भरुन रोहा बाजूकडे पळवून नेऊन पोबारा केला होता. या संदर्भात पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील गुरे मालक यांच्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात अज्ञात गुरे चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून रसायनी पोलिसांच्या मदतीने दि. 22 सप्टेंबर रोजी या गुन्ह्यातील आरोपी पापा इसा कच्ची व आलम अनिस शेख या दोघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत येथील गुरे मालक यांच्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात अज्ञात गुरे चोरांविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या घटनेच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलीस उपाधीक्षक रोहा प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी रसायनी पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपी यांचा तांत्रिक व वैज्ञानिक पद्धतीने वेगाने तपास करून यातील आरोपींचा शोध घेतला आणि यातील आरोपी 1) पापा इसा कच्ची (29), व 2) आलम अनिस शेख (26), दोघे ही सध्या रा. रूम नं.7 पहिला मजला, अलमरवा बिल्डिंग, इमेज टेलरच्या मागे कच्ची चाळ पनवेल, जि.रायगड या दोघांना रसायनी पोलिसांकडून ताब्यात घेऊन दि. 22 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. तसेच पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता या आरोपींना 10ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नागोठणे पोलिसांकडून सदर दोन्ही आरोपींची सखोल चौकशी सुरु असून, या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.







