गुरे चोरणारी टोळी रोह्यात जेरबंद

| धाटाव | वार्ताहर |

रोहे तालुक्यात गुरे चोरणारी टोळी पकडण्यात आली आहे. भल्या पहाटे गावात अनोळखी इसम संशयस्पदरित्या फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. सदर अनोळखी इसम आपल्या ताब्यातील चारचाकी वाहनामधून गुरे घेऊन पसार होण्याच्या तयारीत असताना ग्रामस्थांनी त्या चोरट्यानां नाक्यावर रोखले. या दरम्यान दोघेजण फरार झाले. चालकाला ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच गुरे चोरणार्‍या टोळीला जेरबंद केले.

इंतखाब इकबाल दळवी,अख्तर महाडकर, व आदम मेहबूब महाडकर ( वय 20 ) ( तिघेही रा. शीघ्रे ता. मुरुड ) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. हे सर्वजण पहाटेच्या सुमारास रोहे तालुक्यातील विरझोली गावात संशयस्पदरित्या फिरत असताना दिसून आले. काही वेळातच त्यांनी आपल्या ताब्यातील बोलेरो पीक अप टेम्पोमध्ये एक बैल व सहा गायी असे जनावरे कोंबून चोरून नेत असताना ग्रामस्थांनी त्यांना पाहिले. क्षणातच या घटनेची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली. आणि संतप्त ग्रामस्थांनी विरझोली नाक्यावर नाकाबंदी करून गुरे घेऊन पळून जाणार्‍या टोळीची गाडी अडवली. या दरम्यान दोन चोरट्यांनी घटनास्थळा वरून पोबारा केला.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना दिली.

पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या आदेशानुसार पोलिसांचा पथक घटनास्थळी रवाना झाला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन फरार झालेल्या आरोपीतांच्या मुसक्या आवळल्या व गुरे व टेम्पो सहित एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बाबत पांडुरंग भानू धुमाळ )यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद वायंगणकर करीत आहेत.

Exit mobile version