मुनाफ सईद धुतरेवर गुन्हा दाखल
| आपटा | वार्ताहर |
महिंद्रा पिकअप टेम्पोमधून बेकायदेशीर व अवैधरित्या गुरांची (बैलांची) चोरी करणाऱ्या एका तरुणाला तीन बैल आणि वाहतूक करणारा महिंद्रा पिकअप टेम्पोसह रसायनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवार, दि.11 रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास सावरोली-खारपाडा रस्त्यावरून एका महिंद्रा पिकअप टेम्पोमधून बेकायदेशीररित्या बैल (गुरे) नेणार असल्याची खात्रीलायक माहिती रसायनी पोलिसांना प्राप्त झाली होती. रसायनी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेले रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, आर.टी. सूर्यवंशी, पोलीस हवालदार श्री. पानपट्टे, गोपनीय विभागाचे अंमलदार राहुल भडाळे यांच्या पथकाने सारसई बस स्टॉपजवळ खारपाडा बाजूकडून रसायनीच्या दिशेने येणारा महेंद्रा पिकअप टेम्पो (एमएच-46-बीएम-7590) यामधून एक तांबूस रंगाचा व दोन काळ्या रंगाचे प्रत्येकी 20 हजार रुपये किंमतीचे एकूण तीन बैल दाटीवाटीने गाडीत बांधलेले आढळून आले. सदर चालकाकडे पोलिसांनी परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी मुनाफ सईद धुतरे (32) धंदा चालक, रा. हाळखुर्द, पो. शिळाफाटा खोपोली, ता. खालापूर याच्यावर गुन्हा करण्यात आला असून, त्याच्या ताब्यातील ती बैल (गुरे) व महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपी मुनीम सईद धुतरे याला गुरुवारी पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे हे करीत आहेत.