राजपुरी जेट्टीवर बसायला जागाच नाही
| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी येथून शिडांच्या बोटींचा वापर केला जातो. राजपुरी येथे जंजिरा किल्ला पहाण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून कोटी रुपये खर्चून भले मोठे प्रवासी टर्मिनल बांधण्यात आले आहे. यामध्ये बसण्याची व्यवस्था, अल्पोपहार, स्वच्छतागृह व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु प्रवासी टर्मिनल टेंडर न झाल्याने व पूर्वीच्या ठेकेदाराने ठेक्याची रक्कम न भरल्याने कॅन्टीन व निवारा शेडला कुलूप लागले ते अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे जंजिरा किल्ला पाहायला येणाऱ्या पर्यटकांना जेटीवर बसायला जागा नाही. नाश्त्यासाठी कॅन्टीन नाही, कडक उन्हात उभे राहून तिकीट काढायचे आणि बोटीत बसायचे व बोटीतदेखील सावली नसल्याने पर्यटकांना त्रास होत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
प्रवासी टर्मिनलची इमारत महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून पाच वर्षांच्या कराराने बून केटरर्स यांना देण्यात आली होती. परंतु, सदरच्या बून केटरर्सकडून प्रवासी टर्मिनलची इमारतीची फारशी काळजी घेतली जात नाही. गेले कित्येक महिन्यांचे बिल न भरल्यामुळे मुरुड महावितरणकडून येथील वीज जोडणी तोडण्यात आली होती. ठेक्याची रक्कम न भरल्याने मेरोटाईम बोर्डाकडून बंद करण्यात आले. स्वच्छतागृहाला पाण्याचा तुटवडा होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवासीवर्गाला पंखासुद्धा उपलब्ध होत नाही. त्यामुळे एकंदर या ठिकाणी मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पर्यटकांना कोणतीही सुविधा उपलब्ध होत नसल्याने पर्यटकसुद्धा त्रस्त झाले आहेत. पर्यटकांसाठी सुविधा मिळावी म्हणून स्थानिकांना टेंडर देण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. लवकरात लवकर टेंडर करून जेटीवरील सर्व सुविधा सुरु कराव्यात, अशी मागणी पर्यटक महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडे करीत आहेत.
राजपुरी जेटी नव्याने बांधण्यात आल्यावर सर्व सुविधा करण्यात आल्या होत्या; परंतु 2021 साली आलेल्या वादळामुळे जेटीच्या प्रवासी टर्मिनलची इमारतीवरील सोलर पॅनल उडाले व पत्रेही उडाल्याने मोठे नुकसान झालं. त्यानंतर बून केटरर्सकडून इमारतीचे भाडे न भरल्याने काहीकाळ पार्किंग व कँटिन सेवा बंद होती. परंतु, पर्यटकांच्या मागणीनुसार मेरीटाईम बोर्डाने स्वतःचे कर्मचारी लावून पार्किंग सुरु केली. कँटिनचा ठेका पाच वर्षांचा असल्याने ठेक्याचा काही काळ बाकी असल्याने नवीन ठेका देण्यात आला नाही. लवकरच पूर्ण इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु होईल. सद्य सोलर पॅनल दुरुस्त करून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लवकरच नवीन टेंडर काढून कॅन्टीन सेवा सुरु होईल. पर्यटकांच्या सुविधांवर लक्ष देण्यात येईल.
प्रमोद राहुळ, मेरीटाईम बोर्ड अधिकारी