| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील बायपास रस्त्याच्याजवळ विना परवाना चोरून आणलेली जनावरे वाहून नेणारा टेम्पो माणगाव पोलिसांनी पकडला असून, यामध्ये तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्याकडे चार लाख 10 हजार रुपये किमतीचा माल मिळून आला आहे. सदरची घटना सोमवारी (दि.17) मध्यरात्री घडली असून याबाबतची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष अशोक सगरे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील आरोपी प्रेमकुमार सूर्यवंशी, पदिम कुरेशी, समीर कुरेशी यांनी संगनमत करून तीन लाख रुपये किमतीच्या अशोक लेलंड (एमएच-03-सीव्ही-9624) या गाडीत 1 लाख रुपये किमतीचे पाच मोठया व एक 10 हजार रुपये किमतीचा छोटा म्हैस जातीची जनावरे परवाना नसताना ती कोठून तरी चोरून आणून, दाटीवाटीने कोंबून मुंबई येथे कत्तल करण्यासाठी नेत असताना मिळून आले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.