विचित्र आजाराच्या माकडाला पकडले

उपचारासाठी नॅचरल डिझास्टर रेसक्यु फाऊंडेशन पुढाकार

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानच्या जंगलात विचित्र आजाराने त्रस्त असलेल्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. गेली काही दिवस ते माकड माथेरान शहरात जंगल भागात आढळून आले होते आणि शेवटी वन विभाग यांच्याकडून सदर माकडाला पकडण्यासाठी बदलापूर येथील नॅचरल डिझास्टर रेसक्यु फाऊंडेशन यांना पाचारण करण्यात आले होते.दरम्यान, त्या माकडाला कोणता आजार झाला याचा शोध घेण्यासाठी एमएस दर्जाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माथेरान जंगलात शरीराचा काही भाग बाहेर निघालेले माकड जंगलात आढळून आले होते. त्या माकडाचे फोटो काढून त्याची माहिती पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी माथेरान वन विभागाला दिली होती. शरीराचा एक मोठा भाग त्या माकडाच्या पाठीशी चिकटून बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यावर बदलापूर येथील नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाऊंडेशनचे प्राणी मित्र एकनाथ मेहेर यांनी त्या माकडाला ट्युमर प्रकारचा आजार झाला असल्याचे कळविले होते. मात्र, संबंधित माकड वन विभाग यांच्याकडून पकडून माथेरान पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या ताब्यात दिले जात नसल्याने वन विभाग यांच्याकडून त्या माकडावर योग्य उपचार केले जात नव्हते. मात्र, अशा आजाराची आणखी माकडे जंगलात आहेत, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने शेवटी हा विचित्र आजार आणखी माकडांना त्रासदायक ठरू शकतो, अशी भीती प्राणीमित्र राकेश कोकले यांनी व्यक्त केली होती.

शेवटी वन विभागाने बुधवारी बदलापूर येथील नॅचरल डिझास्टर रेसक्यु फाऊंडेशन या रेस्न्यू टीमला त्या माकडाला पकडण्यासाठी पाचारण केले. या टीमचे योगेश साखरे, एकनाथ मेहेर आणि सपना कराळे या प्राणीमित्र यांनी सकाळी सात वाजता त्या विचित्र आजाराने त्रस्त असलेल्या माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

नॅचरल डिझास्टर रेसक्यु फाऊंडेशन यांच्या मदतीला माथेरान वन विभागाने वन क्षेत्र पाल उमेश जंगम,वन पाल राजवर्धन आढे तसेच वन रक्षक भणगे आदी सोबत होते. सदर विचित्र आजाराने ग्रस्त असलेला माकड माथेरान शहरातील हॉटेल उषा एस्कॉर्टमध्ये फिरत असल्याचे आढळून आल्यावर रेस्न्यू टीमकडून त्या माकडाला त्यांच्या पध्यातीने पकडण्यात आले.पकडलेले माकड पिसाळलेला असल्याने त्याला पिंजर्‍यात बंदिस्त करून नॅचरल डिझास्टर रेसक्यु फाऊंडेशन टीम कडून माथेरान वन विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर माकडाला कोणता आजार झाला आहे. त्याच्या आजाराचे कारण काय? त्या आजारावर कशा प्रकारे उपचार करता येतील. त्या माकडाच्या संसर्ग अन्य माकडांना झाल्यास कोणते आजार उद्भवू शकतात. यासाठी माथेरान वन विभागाकडून प्राण्यावर उपचार करणारे एमएस दर्जाचे डॉक्टर यांचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार ते माकड अशा संस्थेचे किंवा प्राणी रुग्णालयात पाठवून त्या माकडाला झालेल्या आजाराचे निदान करण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाने दिली आहे.

Exit mobile version