महाड शहरात बसणार सीसीटीव्ही कॅमेरा

निविदा प्रक्रिया पूर्ण; शहरातीत 30 ठिकाणी वॉच

| महाड | प्रतिनिधी |

विविध ठिकाणी घडत असणाऱ्या महिलांवरील अत्याचार व इतर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, महाड शहरांमधील कायदा आणि सुव्यवस्था चोख राहावी या दृष्टीने महाड नगर परिषदेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात 30 ठिकाणी 104 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एक कोटी 67 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या सहा शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची तयारी नगरपालिकेकडून सुरू आहे. पश्चिम बंगालमधील कोलकत्ता तसेच बदलापूर येथील शाळेमध्ये घडलेल्या अत्याचारानंतर सीसीटीव्ही कॅमेराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही योग्य प्रकारे कार्यान्वित असतील तर गुन्हेगारांचा छडा लावणे सोपे होत असल्याने पोलीस प्रशासनाकडून सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना विविध आस्थापनांना देण्यात आला आहे. महाड नगरपालिकेकडून काही महिन्यांपासून शहरातील विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

शहरामध्ये ऐतिहासिक चवदार तळे, वीरेश्वर मंदिर, क्रांती स्तंभ परिसर अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. महाड परिसरात औद्योगिक क्षेत्र, बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरांमध्ये कायमच पर्यटक व नागरिकांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राहावी, या दृष्टीने नगरपालिकेने एक कोटी 67 लाख रुपये खर्चून शहरातील 30 ठिकाणी 104 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या निविदा देखील प्रसिद्ध झाले असून लवकरच शहरात सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. शाळांसाठीही मागणीमहाड नगरपालिकेच्या सहा शाळा असून या शाळांमध्ये सद्यस्थितीत सीसीटीव्ही नाहीत.

जिल्हा नियोजन समितीकडे महाड नगरपरिषदेने स्वतंत्र निधीची मागणी केली आहे. याला मंजुरी मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लवकरच शहरातील पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. शहरातील चवदार तळे, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड परिसर, शहरातील मुख्य उद्याने व रस्ते तसेच रहदारीच्या ठिकाणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

महाड सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याकरता एक कोटी 67 लाख रुपये खर्च येणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल.

परेश साळवी, अभियंता, महाड नगरपरिषद
Exit mobile version