पेणमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसतील केव्हा?

| पेण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण तथा तिसर्‍या मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून पेणकडे पाहिले जात आहे. परंतु, दिवसेंदिवस पेणमध्ये शहरीकरण वाढत असल्याने नकळत इतर अवैध बाबीही वाढत आहेत. त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कर्मचार्‍यांच्या (मनुष्यबळ) अभावी अपुरी पडत आहे. त्यासाठी पेण शहरात जिल्हा नियोजन म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तरतूद करून ठेवली आहे. त्याची निविदा निघून वर्कऑर्डरही ठेकेदाराला दिली आहे. मात्र, आजतागायत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत.

निवडणुकीच्या धामधुमीमध्ये पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. सगळीकडे लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे. जेणेकरून पेण शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना मदत होईल. याबाबत पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 145 सीसीटीव्ही कॅमेरे नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणार होते. मात्र, आम्ही सर्व शहराचा सर्वेक्षण करून 158 कॅमेर्‍यांची गरज असल्याचे कळविले आहे. एवढ्याला काम पूर्ण होणे गरजेचे होते. पण, काम का थांबले आहे, याबाबत आमचे कर्मचारी नगरपालिकेशी संपर्क करून विचारणा करत आहेत. त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी पेण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही कामाची वर्कऑर्डर दिलेली आहे. बेसिक ठेकेदाराने कामदेखील सुरू केले आहे. मात्र, मध्येच काम का थांबले आहे, याबाबत ठेकेदाराशी विचारणा करून त्याला तातडीने काम सुरू करण्यास सांगून युध्दपातळीवर पेण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्यात येतील.

पेण शहरात जर 158 सीसीटीव्ही कॅमेरे नजीकच्या काळात बसविल्यास पेण शहरातील अनेक अवैध धंद्यांना आळा बसेल तसेच शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेला मदत होईल आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत पेण शहर येईल.

Exit mobile version