। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायांविरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडून निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 110 पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 48 सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यात आले असून एमपीडीए कायद्यान्वये दोन सराईत स्थानबध्द आहेत. 14 देशी बंदुका, 37 जिवंत काडतुस, 43 तलवारी, नऊ कोयते-चॉपर, चाकु अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय पाच हजार 473 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अवैध मद्यसाठा, विक्रीसंदर्भात एक हजार 191 गुन्हे दाखल असून एक कोटी, 44 लाख, 40 हजार 758 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
राज्यात प्रतिबंधित गुटखा साठा, विक्रीप्रकरणी 52 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 93,19,415 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सात जणांविरुध्द अमली पदार्थविषयक गुन्हे दाखल करण्यात आले. याअंतर्गत 26,61,504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांची किंमत दोन कोटी, 43 लाख, 37 हजार इतकी आहे. याशिवाय दोन कोटी, 22 लाख, 47 हजार 840 रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. आदर्श आचार संहितेतंर्गत आतापर्यंत सात कोटी, 82 लाख, 31 हजार 439 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.