गुन्ह्यांची उकल जलद गतीने करण्यासाठी सीसीटीव्हींचे जाळे

एक कॅमेरा सुरक्षेसाठी; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची संकल्पना

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल सीसीटीव्हीच्या मदतीने मोठ्या प्रमाणात झाली आहे. या तिसर्‍या डोळ्याची अधिक मदत घेऊन जिल्ह्यातील महिला, नागरिक व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘एक कॅमेरा सुरक्षेसाठी’ ही संकल्पना लवकरच अंमलात आणून जिल्ह्यातील बाजारपेठांसह गर्दीच्या ठिकाणांवर प्रत्येकाच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

रायगड पोलीस दलाच्या अखत्यारीत पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांसह 28 पोलीस ठाणी आहेत. जिल्ह्यात एक हजार 800 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय कामांव्यतिरिक्त अनेक गुन्ह्यांची उकलही पोलिसांमार्फत केली जाते. गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांना वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे जिल्ह्यातील अनेक भागात पसरवून गुन्हेगारी व काही अनुचित प्रकार रोखण्याचा प्रयत्न रायगड पोलीस दलामार्फत केला जाणार आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून ‘एक कॅमेरा सुरक्षेसाठी’ हे अभियान राबविले जाणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बाजारपेठांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. रस्त्यावरील प्रत्येक हालचालीवर कॅमेरातून लक्ष ठेवले जाणार आहे.

गुन्हेगारीवर बसणार अंकुश
जिल्ह्यात गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार, महिलांची छेडछाड करणार्‍यांबरोबरच दुकान व घरफोडी करणार्‍यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात एक हजार नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उद्देश आहे. सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याबाबत पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात सीसीटीव्हीचे जाळे अधिक पसरणार आहेत.

वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल सीसीटीव्हीतून मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दुकानाबाहेर रस्त्यावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कॅमेरा बसविण्याचा प्रयत्न आहे. पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. यातून महिला सुरक्षेबरोबरच अन्य गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड
Exit mobile version