आता कॅमेर्यांद्वारे चालकांवर कारवाई; अलिबाग शहरात बसविणार 26 कॅमेरे
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर अंकुश ठेवताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. आता मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीला अलिबाग शहरात 26 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेर्यांमार्फत बेशिस्त चालकांवर कारवाई केली जाणार आहे. या कॅमेर्यांतून गाड्यांचे छायाचित्र व नंबर मिळवून चालकांविरोधात ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ‘खाकी’च्या मदतीला सीसीटीव्ही आल्याने कारवाईत पारदर्शकता येईल, असे बोलले जाते.
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल होतात. तसेच अलिबागमध्ये नोकरी-व्यवसायनिमित्त येणार्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आपसूकच शहरात वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. वाहन चालविताना अपघात होऊ नये, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वाहतूक पोलीस नाक्या-नाक्यावर तैनात केले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाते. तरीदेखील काही वाहनचालक पोलीस गेल्यावर पुन्हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असतात. अनेकवेळा वाहतूक कोंडी, अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. आता मात्र पोलिसांचा त्रास कमी होणार आहे.
अलिबाग शहरामध्ये समुद्रकिनार्यापासून जिल्हा टपाल कार्यालय, महावीर चौक अशा वेगवेगळ्या भागात 30 ठिकाणी 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यापैकी अलिबाग एसटी स्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाजारपेठ आदी परिसरातील 26 कॅमेर्यांतून बेशिस्त चालकांवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे. चालकाने वाहन पार्किंग करताना चुकीच्या पद्धतीने केल्यास, वाहन वेगात चालविल्यास कॅमेर्यांमध्ये वाहनांचे छायाचित्र, वाहनांचे नंबर कैद केले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शहरात वाहन चालविताना, वाहन पार्किंग करताना चालकांनी आता सावध राहावे. कॅमेर्याची नजर प्रत्येक वाहन चालकांच्या हालचालीवर राहणार आहे. त्यांची अंमलबजावणी मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
स्पीकरद्वारे चालकांना सूचना
अलिबाग शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेर्यांच्या बाजूलाच काही स्पीकरही लावण्यात आले आहेत. काही मिनिटाने गर्दीच्या वेळी स्पीकरद्वारे चालकांना सूचना केली जात आहे. वाहन व्यवस्थित चालवा, वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी वाहन पार्किंग करा, अशा अनेक सूचना केल्या जात आहेत.