| सारळ | वार्ताहर |
होळी हा हिंदूंचा सांस्कृतिक व धार्मिक सण आहे. या सणाचे महत्त्व म्हणजे, आपल्यामधील दुर्गुण होळीत टाकून त्यांचे रूपांतर सद्गुणांमध्ये, चांगल्या गुणांमध्ये होऊन आपण चांगले वागू, असा संकल्प केला जातो. जे वाईट असेल ते होळीमध्ये जळून जाईल. चांगल्या विचारांचा, चांगल्या सुभाषितांचा शिमगा करा, अपशब्दांची, शिव्यांची होळी करा. हा सण पौराणिक काळापासून सुरू आहे. होळी सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करणे असा होतो. शहरांमध्ये तसेच खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी होळी सणानिमित्त होळ्या पेटविण्यात येतात. होळी पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर केला जातो. रात्रभर या होळीमध्ये लाकडे जाळल्या जातात. यावेळी अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात. होळी म्हणजे रंगांचा सण. त्यानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन रंगांची उधळण करा. परंपरा जपत होळी नक्की करा, पण त्यासाठी वृक्षतोड करू नका.टाकाऊ पदार्थांची होळी साजरी करा.