| नागोठणे | वार्ताहर|
गणेशोत्सव तसेच आगामी काळात येणारे सर्वधर्मीय सण कोणत्याही समाजाबद्दल आपल्या मनात भेदभाव न ठेवता एकमेकांशी भावबंधकीने राहून आनंदाने, मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी केले आहे.
नागोठणे ग्रामपंचायत प्रशासकीय हॉलमध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित नागोठणे पोलीस ठाण्याहद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, व्यापारी असोसिएशन, वाहतूक संघटना, मोहल्ला कमिटी सदस्य यांच्या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नागोठणे सरपंच डॉ मिलिंद धात्रक, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश जैन माजी सरपंच विलास चौलकर, सुरेश गायकर, किशोर म्हात्रे, ज्ञानेश्वर सांळुके, अशफाक पानसरे, एकनाथ ठाकूर, अनिल गिते, विवेक सुभेकर, यशवंत चित्रे, अमित मोदी, दिपेंद्र आवाद, दिनेश घाग, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, विनोद पाटील, सत्यवान पिंगळे व नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक उपस्थित होते.