गणेशोत्सव आनंदात साजरा करा

पोलीस उपविभागीय अधिकारी चौधरींचे आवाहन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गणेशोत्सव हा सण अलिबागमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या सणामध्ये नागरिकांचेही चांगले सहकार्य मिळालेले आहे. यंदाही हा सण आनंदात व शांतेतत तसेच नियमांचे पालन करीत साजरा करावा, असे आवाहन अलिबागचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांनी मंगळवारी केले. दरम्यान, त्यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना केल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अलिबाग व मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता कमिटीची बैठक अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी (दि. 3) सायंकाळी आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना चौधरी बोलत होते. यावेळी अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, मांडव्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई, शेकापचे सुरेश घरत, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, नागरिक व शांतता कमिटीचे सदस्य, नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

गणेशोत्सव सात सप्टेंबरपासून ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळाने घेतली पाहिजे. मिरवणुकीदरम्यान रुग्णालय व इतर सार्वजनिक ठिकाणी बेंजो, डिजेचा आवाज मोठा करून त्यांना त्रास होणार नाही याची दखलही प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करीत हा सण मंगलमय व आनंदमय वातावरणात साजरा करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान, उपस्थितांनी काही सूचनाही मांडल्या. त्या सूचनांचे पालन योग्य पद्धतीने करून नागरिकांची सुरक्षा राखण्याबरोबरच वाहतूक कोंडी रोेखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, नागरिकांचेदेखील प्रशासनाला सहकार्य मिळावे, असेदेखील त्यांनी सांगितले.

प्रांतांची नगरपरिषद प्रशासनाला तंबी
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी सूचना मांडल्या. त्यामध्ये फेरीवाले, उनाड जनावरे अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुख्याधिकारी गैरहजर असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी नगरपरिषद प्रशासनाला तंबी देत सूचना लिहून घ्याव्या, कार्यवाही न झाल्यास मुख्याधिकारी जबाबदार राहतील, अशी ताकीद दिली.
Exit mobile version