। सोगांव । वार्ताहर ।
जागतिक मातृदिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील एसओएस बालग्राम येथे निराधार बालकांनी मोठ्या उत्साहात मदर्स डे साजरा केला. कार्यक्रमावेळी मुलांनी त्यांची काळजी व संगोपन करणार्या मातांसाठी नृत्य व इतर कार्यक्रम सादर केले. मातृदिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. हरमन मायनर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयवंत गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, स्वच्छता व जल विभाग, जिल्हा परिषद रायगड, तसेच रविंद्र गायकवाड, सामाजिक शास्त्रज्ञ, स्वच्छता व पाणी विभाग, जिल्हा परिषद रायगड, आणि डॉ. विकास पवार, जिल्हा एनटीसीपी प्रमुख सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग हे उपस्थित होते.
यावेळी मुलांनी त्यांच्या आईसाठी तयार केलेले नृत्य आणि इतर उपक्रम सादर केले. काही मुलांनी स्टेजवर येऊन त्यांच्या आईमुळे त्यांचे जीवन कसे बदलले याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर आई त्यांच्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करते, यावर मुलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एसओएस अलिबागचे संचालक हिमांशू देबनाथ, सहाय्यक संचालक सावन कुमार गुप्ता, शिक्षण सहकारी लीना, प्रेमलता आणि रितू उपस्थित होते, या सर्वांनी कार्यक्रम अप्रतिम केला. एसओएस बालग्राम मधील ज्येष्ठ मुलींपैकी एकश्रावणी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय छान केले.







