नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

पोलिसांचे नागरिकांना आवाहन; शांतता बैठकीत चर्चा
| पनवेल | वार्ताहर |

नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा, असे आवाहन पोलीस यंत्रणेच्यावतीने नागरिक आणि सार्वजनिक उत्सव मंडळांना करण्यात आले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 अंतर्गत पनवेल तालुका पोलीस स्थानकानजीक असणार्‍या मंथन हॉल येथे अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस सहआयुक्त भागवत सोनावणे आणि पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्यासह पनवेल तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शांतता कमिटीचे प्रतिनिधी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना शिवराज पाटील यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचना केल्या. ते म्हणाले की न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश व महानगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत तसे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे. तसेच सार्वजनिक दुर्गा मुर्तीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी कोणताही आक्षेपार्ह देखावा नसावा,असे त्यानी सुचित केले.

नवरात्रौत्सव ठिकाणी जातीय/धार्मिक भावना भडकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असे आक्षेपार्ह बॅनर,पोस्टर्स, देखावा किंवा फलक नसावा. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रेकॉर्डस्/गाणी वाजविण्यात येवू नयेत. नवरात्रौत्सव मंडळ परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियंत्रण ठेवण्यासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे लावण्यात यावेत. महीला व पुरूष यांना दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगेत दर्शनाची सोय करावी. नवरात्रौत्सव साजरा करीत असलेल्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात आणण्यासाठी जनरेटर, फायर फायटर, इत्यादी अत्यावश्यक साधनसामग्री ठेवण्यात यावी,असे निर्देशही त्यांनी मंडळांना दिले.

मार्गदर्शन करताना पाटील पुढे म्हणाले की नवरात्रौत्सवानिमित्त सार्वजनिक रस्त्यावर/चौकामध्ये/स्थानिक स्वराज्य संस्थांचे जागेवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे व विद्रूप करणारे फ्लेक्स/बोर्डस्/बॅनर्स इत्यादी उभारण्यात येवू नये. विसर्जनावेळी नदी पत्रात ज्यांना पोहोता येत नाही अशांना नदी पात्रात उतरू देऊ नका त्यांच्याऐवजी स्वयंसेवक यांच्या मार्फत देवी मूर्तीचे विसर्जन करून घेणे.यावेळी नवरात्रौत्सव सणाचे अनुषंगाने इतर महत्वाच्या सुचना देवून मार्गदर्शन करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पुढाकाराने आणि पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील पोलीस सह आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीच्या आयोजनाबद्दल सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version