| उरण | वार्ताहर |
नाताळ, दत्तजयंती व थर्टीफस्टसारखे सण नियमांचे उल्लंघन न करता शांततेत साजरे करावे, असे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी केले. तसेच वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी लवकरच ओएनजीसीच्या माध्यमातून शहरात 85 कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचीही यावेळी माहिती दिली.
धार्मिक सणामध्ये प्रामुख्याने नाताळ, दत्तजयंती व थर्टीफस्ट साजरी केली जाणार आहे. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी उरण तालुक्यातील पत्रकार व राजकीय नेतेमंडळी यांच्या बैठका घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी सण हे कोणाच्याही भावना न दुखवता नियमाच्या कचेरीत साजरे करण्यात यावे, असे सांगितले. याबाबत सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन संशयास्पद काही आढळल्यास त्वरित पोलिसांना याची कल्पना द्यावी. तसेच बंदोबस्तात असलेल्या पोलिसांशी वादविवाद न घालता सामंजस्याने मार्ग काढावा, असे सांगितले.