अलिबागमधील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी आरएमसी प्लांट उभारण्यात आले आहे. या प्लांटला विरोध असतानाही गटविकास अधिकारी यांनी ना हरकत दाखला दिला. भातशेतीचे नुकसान होण्याबरोबरच नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत, पुर्वंपार वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांंची भेट घेत समस्या मांडली. त्यांनी त्यांचे गार्हाणे ऐकून घेऊन पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाची पुर्तता लवकरच होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
उसर येथील प्रस्तावित शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी लागणारे आरएमसी काँक्रीटच्या पुरवठ्यासाठी प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्लांटच्या जवळ भातशेती, व फळ पिकांची शेती आहे. धुळ, सिमेंट, केमिकलयुक्त पाणी शेतात जाण्याची भिती आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरएमसी प्लांटला शेतकर्यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केला. या प्लांटला ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला देण्यात आला नाही. ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता हा प्लांट उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सभोवताली शेतकरी, ग्रामस्थ यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. शेतांमध्ये जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पाण्याचा स्त्रोत बंद केला आहे. या प्रकारामुळे पावसाळ्यात पुराचा धोका नाकारता येत नाही.
शेतकर्यांचे पुर्वांपार वहिवाटीचे रस्ते, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद करणे. बेकायदेशीरपणे 600 फुट खोल अशा बोअरवेल मारणे. भातशेतीमध्ये येणारा मातीचा भराव करण्यात आला आहे. तीन महिन्यापुर्वी आरएमसी प्लांट कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या उभारण्यात आला आहे. या बेकायदेशीर कामांवर ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची मागणी केली. मात्र नियमांचे उल्लंघन करीत याठिकाणी हा प्लांट बांधला जात असल्याबाबत उसरमधील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. खानावचे उपसरपंच निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकारी यांना घेराव घातला. आरएमसी प्लांटमुळे होणार्या हानीबाबत त्यांना माहिती दिली. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांची भेट घेत सांगितले की, ग्रामपंचायतीच्या अटी शर्तीनुसार आरएमसी प्लांटला ना हरकत दाखला देण्यात आला आहे. अटीनुसार काम होत नसेल, तर वरिष्ठांशी चर्चा करून जागेवर जाऊन पाहणी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
ग्रामस्थ एक तास उन्हात
उसर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रकल्प उभारणीबाबत बुधवारी दुपारी ग्रामस्थांनी अधिष्ठाता डॉ. पुर्वा पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर जमले. मात्र पुर्वा पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेतली नाही. त्यांना कार्यालयाबाहेरच उन्हात एक तास ताटकळत ठेवले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या या भुमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.







