अमृत महोत्सवासाला शैक्षणिक साज

गरीब मुलांची शाळेची फी भरून वाढदिवस साजरा
मोहन ओसवाल यांचा स्तुत्य उपक्रम
कर्जत | वार्ताहर |
कर्जत शहरातील मोहन ओसवाल यांनी आपला अमृत महोत्सवी 75 वा वाढदिवस एका शाळेतील दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची एका वर्षाची फी भरून साजरा केला. आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला शैक्षणिक साज चढवून केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कर्जत महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर शाळेत अनेक गरीब मुले शिक्षण घेत आहेत. काही हुशार विद्यार्थ्यांचे पालक आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे फी भरू शकत नाहीत. त्यांचे शिक्षण व्हावे यासाठी कर्जत शहरातील मोहन केसरीमल ओसवाल यांनी आपला 75 वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने करण्याचे ठरविले. विद्या विकास मंदिर या शाळेतीलप्रगती दीपक सरावते, दिव्या दुर्गे, जयेश जाधव, सार्थक ढोले, सानिया सय्यद या दहावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची वर्षाची फी भरली. फीच्या रकमेचा धनादेश ओसवाल यांनी संस्थेच्या मीना प्रभावळकर यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका स्नेहा गाढे, पर्यवेक्षिका श्रद्धा मुंढेकर उपस्थित होत्या.
आमच्या शाळेत गरीब विद्यार्थी शिकतात. त्यांना शाळेची फी भरणे शक्य होत नाही. अनेक दानशूर व्यक्ती त्यांची फी भरण्यासाठी पुढे येतात म्हणूनच आम्ही या मुलांना शिकवू शकतो.
मीना प्रभावळकर, मुख्याध्यापिका
माझा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करावा, असे कुटुंबीय आणि माझ्या मित्र मंडळीने ठरविले होते. मात्र, मी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले आणि ते प्रत्यक्षात उतरविले.
मोहन ओसवाल

Exit mobile version