। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील नगरपरिषद हद्दीत राहणार्या नागरिकांना भेडसावणार्या समस्येंबाबत कर्जत शहर विकास समिती कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून शहरातील 26 समस्यांचे निवेदन कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मागण्यांचा अभ्यास आणि त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहिती मुख्याधिकारी शनिवारी (दि.28) पालिका संघर्ष समिती समोर ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, समस्यांवर नागरिकांचे समाधान झाले नाही तर त्याच दिवशी कर्जत पालिकेविरोधातील आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचे संघर्ष समितीकडून सांगण्यात आले आहे.
कर्जत शहरातील नागरी समस्यांबाबत कर्जत शहर विकास समिती आवाज उठवत आहे. याच माध्यमातून रविवारी (दि.22) शनी मंदिर येथे झालेल्या बैठकीत शहरातील समस्यांचा आढावा घेणारे निवेदन पालिका मुख्याधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार अॅड. कैलाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी समस्यांचे निवेदन देण्यासाठी कर्जत शहर विकास समितीच्या आवाहनानंतर असंख्य कर्जतकर पालिका कार्यालयात जमले होते. यात माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी नगरसेवक संतोष पाटील, सुनील गोगटे, सोमनाथ ठोंबरे, मोहन ओसवाल, राजाभाऊ कोठारी, भानुदास पालकर, दिलीप गडकरी, सुरेश खानविलकर, मल्हारी माने, रणजित जैन, राजेश ओसवाल, विजय हरिश्चंद्र, अॅड. गोपाळ शेळके, अनिल भोसले, अशोक दिघे, अॅड. भारती ढाकवळ, स्विटी बार्शी, सतीश मुसळे, अनिल मोरे, सुहास प्रधान, प्रशांत उगले, सोमनाथ पालकर, समीर चव्हाण, अशोक शिंदे, प्रभाकर करंजकर, रंजन दातार, कृष्णा जाधव यांच्यासह महिला नागरिकांनी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.