अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

| सुतारवाडी | प्रतिनिधी |

वाढदिवस म्हणजे आयुष्यातील एक खास दिवस, जो आनंदाने, प्रेमाने कृतज्ञतेने साजरा केला जातो. काही जण आपल्या वाढदिवसानिमित्त सजावट, विद्युत रोषणाई, फुग्यांच्या माळा, फुग्यांचे डेकोरेशन बॅनर महागडे केक यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. परंतु, या सर्व गोष्टी टाळून एका मुलाने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अद्वैत रणजीत लवटे या मुलांने व त्याच्या कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील खरबाची वाडी वस्ती या शाळेत आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी वाढदिवसानिमित्त केक व डेकोरेशनवरील खर्च टाळून खरबाची वाडी वस्तीवर व खरबाचीवाडी येथील मुलांना अल्पोपहार, फळे, चॉकलेट इ. खाद्यपदार्थ आणि सर्व मुलांना चित्रकला रंग साहित्य व चित्रकला वह्याचे वाटप केले. तसेच अतिशय गरीब कुटुंबातील चार मुलांना नवीन कपडे व चप्पल भेट दिले. आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपून दुर्गम भागातील मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जगन राठोड, उपशिक्षक अमोल राठोड यांनी लवटे कुटुंबीय प्रति सद्भावना व्यक्त करत आभार मानले.

Exit mobile version