जीविता पाटील यांची वाढदिवासनिमित्त अनोखी भेट
| अलिबाग | प्रतिनिधी |
सामाजिक कार्यकर्त्या जीविता पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांधण येथील संपर्क बालग्राममधील बालकांसाठी बादली आणि मग भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी वाढदिवस एक निमित्त मात्र आहे; परंतु तो साजरा करण्याचा खरा उद्देश कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा असतो आणि म्हणूनच सामाजिक जाणीवेतून गरजवंत मुलांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी काहीतरी करावं ही निर्मळ भावना त्यामागे असते, असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्त्या जीविता पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील 12 अंगणवाड्यांमधील मुलांना पेन, पेन्सिल, राजगिरा लाडूची पाकिटे व बिस्कीट पुडे देऊन आपला वाढदिवस साजरा केला. तसेच परहुरपाडा येथील वृद्धाश्रमात अन्नदान केले, तर रस्त्यावर काम करणार्या कामगारांच्या मुलांना अन्नदान करून अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांना रायगड जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, तसेच सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेकांकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.