| म्हसळा | वार्ताहर |
माणसाला जगण्यासाठी जसा अन्न, वस्त्र आणि निवारा गरजेचा आहे तसाच, आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात इलेक्ट्रिक वीज अत्यंत गरजेची बाब बनली आहे. वीज निर्मिती आणि वितरण व्यवस्था, दुरूस्ती आदी कामांत महावितरण कंपनीच्या लाईनमन यांचा सिंहाचा वाटा असतो. या महावितरणमधील लाईनमन अर्थात प्रकाशदुत यांच्या कार्यास सलाम म्हणुन राज्यभर 4 मार्च हा दिवस ‘लाईनमन दिवस’ साजरा केला जातो.
म्हसळा येथील महवितरण कंपनीच्या लाईनमन यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत वीजेचा वापर आणि भविष्यातील विजेबाबत धोक्याची घंटा याची जाणीव करून देण्यासाठी म्हसळा शहरात प्रचार व प्रसार करताना जनजागृती रॅली काढून ‘लाईनमन दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लाईनमन आणि कर्मचारी वर्गाने हातात घोषवाक्य फळकाद्वारे जनजागृती रॅलीमध्ये भविष्य जपण्यासाठी उर्जा वाचवा, प्रकाशाची गरज नसेल तेव्हा वीज बंद करा, वेळीच शहाणे व्हा आणि वीजेचा गैरवापर टाळा, छोट्या छोट्या कृतीतून वीज वाचवा, इंधनाचा गैर वापर थांबवा, उर्जा वाचवा पृथ्वीला हरीत बनवा, उर्जा वाचवून ग्लोबल वार्मिंगची तीव्रता कमी करा अशा सूचना केल्या. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता गोरेगाव विभाग पाटील, म्हसळा उपविभागातील अभियंता घुगुळकर, फडके, झांबरे, माने आणि लाईनमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.