क्षात्रैक्य समाज अलिबाग संस्थेच्या वर्धापन दिनाचे आयोजन

‘क्षात्रैक्य भूषण’ व ‘क्षात्रैक्य जीवन गौरव’ पुरस्कारांचे वितरण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
क्षात्रैक्य समाज अलिबाग संस्थेच्या 21 व्या वर्धापनदिनी ‘क्षात्रैक्य भूषण’ व अतिशय सन्मानाचा समजला जाणारा ‘क्षात्रैक्य जीवन गौरव’ पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रविवार, 27 मार्च 2022 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष अविनाश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार असून अशोक गणपत पाटील समारंभाचे कार्याध्यक्ष आहेत. तर दुपारच्या सत्रात वधू-वर सूचक परिचय मेळाव्याच्या निशा विवेक नाईक या अध्यक्ष आणि मनोज दत्तात्रेय पाटील उपाध्यक्ष आहेत. कुरुळ, उंडीचे भाट, ता.अलिबाग, जि.रायगड येथे संस्थेच्या वास्तूत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सकाळी 10-00 ते सायंकाळी 5-00 यावेळेत हा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या सकाळच्या सत्रात संस्थेने केलेल्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. तर दुपारच्या सत्रात वधु-वर सूचक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
केळवा-माहिम-पालघर येथील कृषिभूषण जयवंत मुकुंद चौधरी, निसर्ग निर्माण अ‍ॅग्रो प्रॉडक्टचे डायरेक्टर मकरंद चुरी, कृषिभूषण सौ.अंजली म.चुरी, दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती मनीषा चौधरी, क्षात्रैक्य परिषद मुंबईचे अध्यक्ष जगदीश पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दुसर्‍या सत्रात दुपारी 2-00 ते 5-00 या वेळात माळी समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांची नाव नोंदणी तसेच वधू-वर सूचक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्त क्षात्रैक्य समाज बंधू-भगिनींनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.

Exit mobile version