क्षात्रैक्य समाज अलिबाग संस्थेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात

। मुरुड । वार्ताहर ।
क्षात्रैक्य समाज अलिबाग संस्थेचा 21 वा वर्धापनदिन कुरुळ, अलिबाग येथील कै. सुमित्रा कृष्णाजी नाईक या भव्य सभागृहात मोठ्या उपस्थितीत पार पडला. संस्थेचे अध्यक्ष अविनाश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गनिर्माण ग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर मकरंद चुरी आणि त्यांच्या पत्नी कृषीभूषण अंजली चुरी, दहिसर विधानसभा मतदार संघाच्या आमदार मनिषा चौधरी, अलिबाग पालघरचे संपर्क प्रमुख कृषीभूषण जयवंत चौधरी, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, संस्थेचे सचिव प्रदीप नाईक, स्वागताध्यक्ष अशोक गणपत पाटील, उपाध्यक्ष अभिजित राणे, श्रीकांत पाटील, खजिनदार मनोज राऊळ, रवींद्र वर्तक, सहसचिव महेश कवळे, श्रीनाथ कवळे, सुरेंद्र नागलेकर, द्वारकानाथ नाईक, संतोष पाटील, मोहन वर्तक, रमेश नाईक, अ‍ॅड. समाधान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील गुणवंत व्यक्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. द्वारकानाथ वामन नाईक आणि दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मनिषा चौधरी यांना क्षात्रैक्य जीवन गौरव हा अतिशय मानाचा पुरस्कार, तर आवासचे सरपंच अभिजित राणे आणि श्रीकांत पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्षात्रैक्यभूषण पुरस्कार वितरित करण्यात आले.
याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपनिरीक्षकपदी निवड झालेली स्वरुपा पाटील, साहित्यिक श्रीकांत कवळे, अ‍ॅड. विलास नाईक, हर्षद घरत, अ‍ॅड. के.डी. पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव प्रदीप नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे बदलते रुप ,येथील विविध समाजोपयोगी उपक्रम यांचा लेखाजोखा मांडला. संस्थेला अधिक उंचीवर नेण्यासाठी तरुणांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तर अध्यक्ष अविनाश राऊळ यांनी आपल्या भाषणात संस्थेने केलेल्या वर्षभराच्या कामकाजाचा व विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. के.डी. पाटील, तर आभार प्रदर्शन महेश कवळे यांनी केले. दुपारच्या सत्रात नीशा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वधूवर मेळावा आयोजित झाला. यावेळी मनोज पाटील, रवींद्र वर्तक, श्रीनाथ कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण दोनशे वधूवरांनी आपापली नावे नोंदवून या मेळाव्याचा लाभ घेतला.

Exit mobile version