| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील सारडे गावातील कोमनादेवी ऑक्सिजन पार्क येथे सारडे विकास मंचाच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी, महिला बचत गट, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
एकेकाळी उजाड आणि ओसाड असलेल्या या डोंगरावर आज हजारो वृक्ष हिरवाईची चादर पांघरून उभे आहेत. सारडे विकास मंचाच्या सातत्यपूर्ण वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमेमुळे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क आज उरण तालुक्यातील पर्यावरण संवर्धनाचे आदर्श केंद्र बनले आहे. दररोज शेकडो नागरिक सकाळ-संध्याकाळ येथे फेरफटका मारण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भेट देत आहेत. कार्यक्रमानिमित्त निशा म्हात्रे यांच्या हस्ते ऑक्सिजन पार्कमध्ये सातत्याने कार्य करणाऱ्या 12 महिला मजुरांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. उन्हाळा, पावसाळा किंवा वादळी वाऱ्याची पर्वा न करता झाडांचे संगोपन करणाऱ्या या महिलांच्या परिश्रमाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच, शुभम पाटील आणि समीर पाटील यांचाही विशेष गौरव करण्यात आला. सर कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम गवंडी, पोलीस हवालदार विजय पाटील, रमेश घुगरे, स्वप्निल म्हात्रे, माजी सरपंच प्रसाद पाटील, सरपंच रोशन पाटील, उपेंद्र ठाकूर, निवास गावंड, अनिल नायडू, प्रकाश माळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, श्री राधाकृष्ण महिला ग्रुप, सारडे विकास मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोमनादेवी पार्कमध्ये हरित क्रांतीचा उत्सव
