एक महिना उलटला, चार आरोपी अजूनही फरार
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्टमधील कुंटणखाना प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला असला तरी यातील चार आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.
या प्रकरणातील आरोपी गणेश गायकर आणि गणेश अण्णा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तिसरा आरोपी सुनील मेहता याचे लोकेशन उत्तर प्रदेशात आढळत असून, चौथा आरोपी राजू मंडल याचा ठावठिकाणा पश्चिम बंगालमध्ये असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच गणेश अण्णा हा बंगळुरुमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गणेश गायकर याने सर्व मोबाईल बंद केल्यामुळे त्याचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, म्हाडा वसाहत येथील त्याच्या घरावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. हे आरोपी वेगवेगळ्या राज्यांत लपून बसल्याने त्यांना पकडणे अधिक कठीण झाले आहे. या चारही आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपी कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून काढले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून, लवकरच या चौघांनाही अटक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







