। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातून वाहणार्या उल्हास नदीवर श्री प्रति पंढरपूर क्षेत्र विकसित केले आहे. उल्हास नदीच्या तीरावर वसलेले प्रति पंढरपूर येथे असलेल्या उल्हास नदीमध्ये भरपूर पाणी असावे, यासाठी सिमेंट बंधारा बांधण्यात येणार होता. दरम्यान, उल्हास नदीमध्ये बांधण्यात येत असलेल्या सिमेंट बंधार्याचे काम सुरु झाल्याने पावसाळ्यानंतर उल्हास नदी पात्रात तेथील परिसर जलमय झालेला दिसून येणार आहे.
कर्जत शहरातील आमराई परिसरात 52 फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. या मूर्तीच्या उदघाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री येणार होते. त्यावेळी कोरडी असलेल्या उल्हास नदी मध्ये पाणी दिसून यावे यासाठी उल्हास नदी मध्ये मातीचा बांध घालण्यात आला. त्यावेळी त्या उदघाटन सोहळ्याला आलेल्या वारकर्यांना उल्हास नदीमधील पाणी पाहून आळंदी मध्ये असल्याचा भास त्या ठिकाणी अनुभवला होता. त्यामुळे त्या भागात उल्हास नदीमध्ये सिमेंट कोल्हापूर टाईपचा बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी होत होती. उल्हास नदीमध्ये कोलापूर टाईप चा बंधारा बांधण्याची परवानगी मिळाली आहे. कोल्हापूर टाईप बंधारा या प्रकल्पासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाने तब्बल 75 लाख निधी दिला होता. त्या निधीमधून बांधण्यात येणारे कोल्हापूर टाईप बंधार्याचे काम सुरु झाले आहे. सरकारी विश्रामगृहाच्या मागे असलेल्या मुद्रे स्मशानभूमीच्या मागे हा सिमेंट बंधारा बांधण्यात येत आहे. साधारण 100 मीटर लांबीचा हा सिमेंट बंधारा पावसाळा सुरु होण्याआधी पूर्ण करण्याचे आव्हान पाटबंधारे खात्यावर आहे. या बंधार्यामुळे ऑक्टोबरपासून तेथील परिसर पूर्वी कोरडा असलेला नदी परिसर पुढील वर्षांपासून जलमय झालेला दिसून येणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रति पंढरपूर क्षेत्र परिसर आळंदी सारखा दिसू लागणार आहे.