केंद्र सरकारची जलजीवन योजना रखडली

पाच कंत्राटदार काळ्या यादीत जाण्याची शक्यता

| पनवेल | वार्ताहर |

पनेवल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दारापर्यंत पाणीपुरवठा व्हावा म्हणून राबविण्यात येणारी केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना अनेक गावांमध्ये रखडली आहे. पनवेल तालुक्यात अद्याप काम सुरू न केलेल्या 14 कामांची फेरनिविदा प्रसिद्ध करून नवीन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी घेतला आहे. कामे न करणाऱ्या पाच कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली.

राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेची 131 कामे पनवेल तालुक्यात सुरू आहेत. 131 पैकी 87 ठिकाणी ही कामे कमी-अधिक प्रमाणात सुरू आहेत. तालुक्यातील 27 कामे रखडली होती. कामासाठी आवश्यक जमिनीचे संपादन, कंत्राटदाराची उदासीनता, वनविभागाचा जागेचा अडथळा आदी कारणांमुळे ही कामे रखडली होती. पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात डॉ. भरत बास्टेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. महेश बालदी, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. कंत्राटदारांनी दिलेल्या बेजबाबदार उत्तरांमुळे उपस्थितांनी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. वारंवार नोटीस देऊनही कंत्राटदार प्रतिसाद देणार नसतील तर त्यांनी काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या. 15 दिवसांत कामचुकार कंत्राटदारांबाबत निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच या बैठकीत देण्यात आले. 17 कामांमध्ये आलेले वनविभागाचे अडथळे दूर झाले असून, उर्वरित 14 कामांची निविदा नव्याने काढण्यात येणार आहे. नऊ ते 12 महिन्यांपूर्वी कार्यादेश देऊनही कंत्राटदाराने काम सुरू न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.

14 कामांच्या फेरनिविदा काढण्यात येणार आहेत. ही कामे घेणाऱ्या पूर्वीच्या चार ते पाच कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. पुढील 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्या कंत्राटदाराकडून कामे सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.

एस.ई. वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पंचायत समिती
Exit mobile version