सेंट्रल ते बेलापूर मेट्रोची चाचणी यशस्वी

नवीन वर्षात सिडको सुसाट
| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वर धावणार्‍या मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. सेंट्रल पार्क ते बेलापूर या स्थानकांदरम्यान सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकडॉ. संजय मुखर्जी, यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी घेण्यात आली. सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत. मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर हा 11 किमी लांबीचा व 11 स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून लवकरच सर्व 11 स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज होणार आहेत.

मेट्रो मार्ग क्र.1 च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, डॉ. के. एम. गोडबोले, संतोष ओंभासे,सुनील गुज्जेलवार,अनुप अग्रवाल रीतेश गर्ग हे विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क ते पेंधर स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली असून या मार्गाकरिता सीएमआरएस यांची मंजुरीही मिळाली आहे. आता सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यानही मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे. यामुळे संपूर्ण मार्ग क्र. 1आता लवकरच प्रवासी वाहतुकीकरिता खुला होणार असल्याने नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार डॉ. संजय मुखर्जी, सिडको उपाध्यक्ष

सिडकोतर्फे मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महा मेट्रोची अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महामेट्रो हा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम असून नागपूर आणि पुणे येथील मेट्रो मार्गांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी महा मेट्रोतर्फे करण्यात आली आहे. महा मेट्रोच्या देखरेखीखाली मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क (स्थानक क्र. 7 ) ते बेलापूर (स्थानक क्र. 1) या स्थानकांदरम्यान, 5.96 किमी लांबीच्या टप्प्यात अप आणि डाऊन मार्गावर घेण्यात आलेली मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे.

नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील बोकडविरा स्थानक आणि द्रोणागिरी नोडला जोडणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्ग ते द्रोणागिरी नोडमधील अंतर कमी होणार आहे.

Exit mobile version